नवी दिल्ली : देशातील लोकसभेच्या निवडणुका १८ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यात येतील आणि त्यानंतर सोमवारी (ता. १८) आचारसंहिता लागू करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी घेतलेली निवृत्ती आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात १५ मार्चला बैठक पार पडणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या नियुक्ती संदर्भात समिती स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी ५ नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करणार आहे.
या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव यांचा समावेश असेल. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नावे देईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील.
दरम्यान, निवडणूक आयोगाची बैठक शुक्रवारी (ता. १५) होणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी सुट्टी असून, सोमवारी किंवा त्यानंतर म्हणजे १८ मार्चनंतर आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.