मुंबई : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसून येत आहे. बदलापूर लैंगिक अत्याचाराने संपूर्ण राज्याला धक्का बसला होता. अशातच आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा हे नव्या वादात सापडले आहेत. आजतक या वृत्तवाहिनीवरील एका डिबेट शोमध्ये चर्चा करताना त्यांनी मराठी समूदायाची तुलना बलात्कारी लोकांसोबत करणारे विधान आहे. त्यामुळे आता सर्व स्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तसेच आलोक शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर आजतक या वृत्त वाहिनीवर चर्चा सुरू होती. त्याबाबत एका प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा यांनी भाजपच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारला. बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या मराठी माणसांचं रक्षण भाजप पक्ष करणार का? असा सवाल त्यांनी विचारला. बदलापूरमध्ये एखाद्या मराठी व्यक्तीने बलात्कार केला तर त्यावेळीही भाजप त्यांना पाठीशी घालणार का? असा प्रश्न आलोक शर्मा यांनी विचारला. त्यामुळे आलोक शर्मांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजप नेत्यांची टीका..
सोशल मीडियावर आलोक शर्मा यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदनीय असल्याचं अनेक जणांनी म्हटलं आहे. भाजप नेत्यांनीही यावर जोरदार टीका केली असून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी यावर राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे.
शिवसेनेकडून तक्रार दाखल..
मराठी माणसाबद्दल आपत्तीजनक विधान करणाऱ्या अलोक शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे. अलोक शर्मा यांना काँग्रेसने काढून टाकावं, त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी यावेळी केली आहे.