कोलकाता : सद्याच्या घडीला पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याबाबत विधान केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. येथील कोलकाता बलात्कार प्रकरणी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगाल सरकारने आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांना मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत चर्चेचं निमंत्रण दिलं होतं.
त्यासाठी, ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांकडेही पोहोचल्या. मात्र, 2 तासांहून अधिक वेळ त्यांनी वाट पाहूनही आंदोलक डॉक्टर त्यांच्यासोबत चर्चेला न आल्यामुळे त्यांनी आता स्पष्टच शब्दात भूमिका मांडली आहे. तसेच, मी पश्चिम बंगालच्या जनतेची हात जोडून माफी मागते, मी डॉक्टरांना परत त्यांच्या कामावर रुजू करू शकले नाही, म्हणजेच डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नाही. त्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी थेट राजीनाम्याचे विधान केले आहे.
राज्यात सध्या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून त्यामुळे, राज्यातील नागरिकांना वेळेवर उपचार व वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. या आंदोलनामुळे आत्तापर्यंत वेळेत उपचार न मिळाल्याने 27 नागरिकांचा जीवा गेला आहे. मात्र, तरीही डॉक्टरांचे आंदोलन सुरूच आहे. मी तीनवेळा प्रयत्न केला, पण डॉक्टरांसोबत चर्चा होऊ शकली नाही. आता, यासंदर्भात जर कुठली बैठक होणार असेल तर ती राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबतच होईल, असेही ममता यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
काही लोकांना माझी खुर्ची हवी आहे : ममता बॅनर्जी
काही लोकांना माझी खुर्ची हवी आहे, मला सत्तेची भूक नाही. मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याची भाषा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. माझ्यासोबत बैठकीला येण्यासाठी आंदोलक तयार होते. पण, आंदोलकांपैकी एक-दोन जणांना बाहेरुन निर्देश येत होते, त्यामुळे माझ्यासोबत बैठकीला, किंवा चर्चेला ते सहभागी झाले नाहीत. पश्चिम बंगालच्या नागरिकांना वाटत होते, आजतरी या आंदोलनावर तोडगा निघेल. मात्र, मी डॉक्टरांना कामावर परत रुजू करू शकले नाही, त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागते. मी 2 तास वाट पाहिली पण आंदोलक चर्चेला आले नाहीत, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक का होऊ शकली नाही?
ममता बॅनर्जी यांनी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते. आंदोलकांपैकी 15 ज्युनिअर डॉक्टरांचं शिष्टमंडळ बैठकीत चर्चेसाठी येणार होते. परंतु, सरकारकडून ही बैठक लाईव्ह टेलिकास्ट करण्यास प्रतिबंध होता. त्यामुळे, बैठकीसाठी आलेल्या डॉक्टरांनी बाहेरच थांबणं पसंत केलं, ते बैठकस्थळी आले, पण सभागृहामध्ये गेले नाहीत. डॉक्टरांकडून ही बैठक लाईव्ह टेलिकास्ट करण्याची मागणी केली जात होती.