नवी दिल्ली : दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्ली एक्साईज पॉलिसी प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना नुकताच जामीन देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सध्या उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली आहे.
सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामिनावर स्थगिती राहील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले. राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्ली एक्साईज पॉलिसी प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना नुकताच जामीन देण्याचा निर्णय दिला होत. मात्र आज ईडीने केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.
2 जून रोजी केजरीवालांकडून आत्मसमर्पण
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने 10 मे रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर 2 जून रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात केजरीवालांनी आपली आंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांसाठी वाढवण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने केजरीवाल यांचे अपील फेटाळले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी 2 जून रोजी आत्मसमर्पण केले होते.