नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीकडून आज दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू (बलविंदर संधू) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची नावे समितीने निश्चित केली आहेत. आता ही नावे राष्ट्रपतींकडे जातील. त्यानंतर या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले. ज्ञानेश कुमार हे केरळमधील आहेत तर सुखबीर संधू हे पंजाबमधील आहे. सुखविंदर संधू हे उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि ‘एलएचएआय’चे चेअरमन राहिले आहेत. ज्ञानेशकुमार १९८८ बॅचचे केरळचे आयएएस अधिकारी आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नवनियुक्त आयुक्त मदत करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन दास यांच्या समितीने या दोन्ही नावांना संमती दिल्याची माहिती आहे.
अरूण गोयल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर एकून रिक्त पदांची संख्या दोन झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून या निवडी केल्या आहेत. या संबंधीची माहिती देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्जुन राम मेघवाल आणि माझ्या समितीने या नियुक्त्या केल्या आहेत. मीटिंगमध्ये मी एक छोटी यादी मागितली होती. त्यावेळी छोटी यादी सादर करावी असे सांगण्यात आले. कारण निवडीपूर्वी छोट्या याद्या बनवल्या जातात. त्यामुळेच मी ती यादी मागितली होती. ती यादी मला लवकर मिळाली असती तर दिल्लीत पोहोचल्यावर मला उमेदवारांची माहिती मिळाली असती. पण ती संधी मला मिळू शकली नाही.
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मला दिलेल्या यादीत २१२ नावे होती. मी काल रात्रीच दिल्लीत आलो. सकाळी १२ वाजता निवड बैठकीला जाण्यापूर्वी ही सर्व नावे जाणून घेणे कठीण होते. अशा परिस्थितीत ही २१२ नावे बघून काय उपयोग? आमच्या समितीत पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत आणि मी एकटाच विरोधी पक्ष आहे. सुरुवातीपासून या समितीतील बहुमत सरकारच्या बाजूने आहे. अशा परिस्थितीत सरकारला जे हवे ते होईल. सरकारच्या इराद्यानुसार निवडणूक आयुक्तांची निवड केली जाईल.
दरम्यान, अरुण गोयल यांच्या नियुक्तीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की त्यांची नियुक्ती ही घाईगडबडीत करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर बलविंदर संधू आणि ज्ञानेश कुमार या दोन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.