नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या प्रस्तावात रेल्वे मंत्रालयाने ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला आहे. केंद्र सरकार ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ नावाला प्राधान्य देत असताना रेल्वे मंत्रालयाने हा बदल केला आहे. अनेक संस्था त्याचा प्रचारही करत आहेत. रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आपल्या संविधानात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या दोन्ही नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळाच्या प्रस्तावात ‘भारत’ हे नाव वापरणे कोणत्याही प्रकारे चुकीचे नाही.
रेल्वे मंत्रालयाचा हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला प्रस्ताव आहे, ज्यामध्ये ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्यात आला आहे. लॉजिस्टिक खर्चापासून ते मालवाहतूक आणि इतर गोष्टींपर्यंत ‘भारत’ हा शब्द सर्वत्र वापरला गेला आहे. अहवालानुसार, आगामी काळात केंद्र सरकारच्या सर्व कागदपत्रांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहे.
NCERT ची सूचना
तीन दिवसांपूर्वी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने सर्व शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’च्या जागी ‘भारत’ शब्द वापरण्याची शिफारस केली होती.
समितीचे अध्यक्ष सी.आय. आयझॅक यांच्या म्हणण्यानुसार, समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’च्या जागी ‘भारत’ शब्द वापरणे, ‘प्राचीन इतिहास’च्या जागी ‘शास्त्रीय इतिहास’, ‘भारतीय ज्ञान प्रणाली (IKS)’चा अभ्यासक्रमात समावेश करण्याची शिफारस केली. मात्र, समितीच्या शिफारशींवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे एनसीईआरटीचे अध्यक्ष दिनेश सकलानी यांनी सांगितले.