पुणे : देशभरात आज बुधवार (21 ऑगस्ट 2024) भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. या आंदोलनामध्ये बसपा, चंद्रशेखर आझादाची पार्टी सहभागी झाली आहे. एस/एसटी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समितीने आज भारत बंदची घोषणा केली आहे. राजस्थानमधील एससी/एसटी समुदायांचा लक्षणीय पाठिंबा मिळालेल्या या बंदला देशभरातून मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावलं उचलण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यांना एससी आणि एसटी गटांमध्ये उप-वर्गीकरण करण्याची परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामागे सर्वाधिक गरजू लोकांना आरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे.
काय सुरू आणि काय बंद राहणार?
प्राथमिक माहितीनुसार, सदर भारत बंदमुळे दुकानं, व्यावसायिक आस्थापन बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वच व्यापारी संघटना भारत बंदचं समर्थन करत नसल्यामुळे काही आस्थापनं मात्र सुरू राहणे नाकारता येत नाही. याशिवाय बस, रेल्वे सेवा आणि इतर मार्गांवर काही प्रमाणात या बंदचे परिणाम दिसून येऊ शकतात.