जयपूर: राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. जयपूरमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानमधील निवडणूक निकालानंतर नऊ दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार असून पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर ते आता राजस्थानचे मुख्यमंत्री होणार आहेत.
भजनलाल शर्मा हे भरतपूरचे रहिवासी आहेत. बाहेरचे असल्याचा आरोप असतानाही ते सांगानेरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा हे उपमुख्यमंत्री, तर वासुदेव देवनानी विधानसभेचे अध्यक्ष असतील.