बंगळुरू: नव्या ऑटोरिक्षासाठी मित्रांसोबत लावलेली पैज एका व्यक्तीच्या जीवावर बेतली आहे. पैज जिंकण्यासाठी ही व्यक्ती फटाक्यांच्या डब्यावर बसली आणि पैज जिंकली देखील. मात्र, फटाक्यांच्या स्फोटाने त्याला आपला जीव गमवावा लागला. कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या कोनाकुंटे परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शबरीश असे ३२ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी शबरीश आणि त्याच्या मित्रांनी मद्यपान केले. त्यानंतर ते सर्व जण फटाके फोडत होते. शबरीशच्या मित्रांनी त्याच्यासोबत फटाक्यांच्या एका डब्यावर बसण्याची पैज लावली होती. पैज जिंकला तर नवी कोरी ऑटोरिक्षा घेऊन देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. शबरीशनेदेखील कोणताही विचार न करता पैज स्वीकारली. या घटनेच्या व्हिडीओमध्ये दिसते की, सहा ते सात जण शबरीशला फटाक्यांच्या एका डब्यावर बसवतात आणि नंतर त्याला आग लावतात. फटाका पेटवताच मित्र लांब पळून जातात अन् जोरदार स्फोट होऊन सर्वत्र धूर पसरतो.
फटाक्याच्या स्फोटासोबतच शबरीश जमिनीवर कलंडतो. तो स्वतः सावरून पुन्हा रस्त्यावर बसतो. मात्र, काही क्षणातच तो पुन्हा जमिनीवर आडवा होतो आणि तेथेच त्याचा मृत्यू होतो. याप्रकरणी शबरीशच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दिली आहे. या आधारावर पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.