आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडू संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिरुपती मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. कोट्यवधी भाविक मंदिरात दर्शनासाठी जात असतात. या भाविकांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येत असतो. त्या लाडूंमध्ये बीफ फॅट आणि माशांच्या तेलाचा वापर करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रयोगशाळेतील अहवालावरुन ही बाब आता समोर आली आहे. यामुळे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची तेलगु देसम पार्टी (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस पार्टीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टीडीपीने सेंटर ऑफ एनालिसिस अँड लर्निंग इन लाइव्हस्टॉक अँड फूड (CALF) प्रयोगशाळेचा अहवाल जारी करत वायएसआर टीका केली आहे. वायएसआर पार्टीच्या सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात प्रसाद अन् लाड्डूमध्ये वापरण्यात आलेल्या तुपात पशूंची चरबी आणि माशांचे तेल मिळाले, असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वायएसआर काँग्रेसने चंद्रबाबू नायडू स्वत:च्या स्वार्थासाठी असे आरोप करत असल्याचे म्हटले आहे.
चंद्रबाबू नायडूंचा नेमकाआरोप काय?
सीएएलएफ प्रयोगशाळेच्या अहवालात तुपात माशांचे तेल आणि बीफ टॅलोचे घटक मिळाले आहे. त्यात काही प्रमाणात लार्डसुद्धा आहे. लार्ड डुकरांचा फॅटी टिश्यूपासून काढण्यात येते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मोठा आरोप केला होता. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा हा धक्कादायक आरोप होता. नायडू यांनी दावा केला की, गेल्या ५ वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केले आहे. त्यांनी ‘अन्नदानम’ म्हणजे मोफत जेवणच्या गुणवत्तेशी तडजोड केली असून तिरुमालाच्या पवित्र लाडूंमध्येही तुपामध्ये प्राण्यांची चरबी वापरली आहे.
आपण देवांसमोर शपथ घेऊ या : सुब्बा रेड्डी
वायएसआरचे ज्येष्ठ नेते वाय.व्ही.सुब्बा रेड्डी म्हणाले की, भगवंताच्या प्रसादात लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते, असे म्हणणे अकल्पनीय आहे. व्यंकटेश्वर स्वामींवर माझी श्रद्धा असून नायडूसुद्धा त्यांचे भक्त असल्याचा दावा करत आहेत. यामुळे आपण देवासमोर शपथ घेऊ या. नायडू यांचे आरोप राजकीय फायद्यासाठी असून देवच नायडू आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करेल.
300 वर्ष जुने स्वयंपाकघर, फक्त ब्राह्मणच बनवतात लाडू..
तिरुपती मंदिर हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक आहे. येथे दररोज सुमारे 70 हजार भाविक भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेत असतात. तिचे प्रशासन तिरुपती तिरुमला देवस्थानम द्वारे हाताळले जाते. मंदिर परिसरात बांधलेल्या 300 वर्षे जुन्या ‘पोटू’ किचनमध्ये शुद्ध देशी तूप वापरून दररोज 3.50 लाख लाडू बनवले जातात. हे मंदिराचे मुख्य देऊळ आहे. जे सुमारे 200 ब्राह्मणांनी बनवले आहे. लाडूमध्ये शुद्ध बेसन, बुंदी, साखर, काजू आणि शुद्ध तूप असते.