काबुल : अफगाणिस्तानात तालिबान राजवट परत आल्यापासून महिलांची परिस्थिती वाईट होत चालली आहे. देशात महिलांना अभ्यास करण्यापासून सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर बंदी आहे. आता तालिबानने आणखी एक तुघलकी फर्मान जारी केले आहे. नवीन नियमांनुसार अफगाण महिलांना नर्सिंगचे प्रशिक्षण घेता येणार नाही. अफगाण महिलांच्या स्वातंत्र्यावर हा
घाला असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील महिलांसाठी वैद्यकीय क्षेत्र हा एक शेवटचा पर्याय होता. नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी सांगितले की, त्यांना वर्गात परत न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अफ्ग्राणिस्तानच्या संस्थांनीही याला दुजोरा दिला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत तालिबानने त्यांना बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे संस्थांचे म्हणणे आहे.
एएफपीने मंगळवारी दिलेल्या वृत्तानुसार, काबूलमध्ये झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षण संस्था संचालकांना या निर्णयाची माहिती दिली. तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुंदजादा यांनी हा निर्देश जारी केल्याचे बोलले जात आहे. खासगी प्रशिक्षण संस्थांच्या संचालकांना बोलावून तात्काळ बंदी लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
लिखित स्वरूपात कोणतेही अधिकृत निर्देश जारी केलेले नसताना, संस्था प्रमुखांना प्रलंबित परीक्षा पूर्ण करण्यासाठी फक्त 10 दिवसांचा अवधी देऊन महिला शिक्षण त्वरित थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ‘पुढील सूचना मिळेपर्यंत’ घरी राहण्यास सांगण्यात आले आहे.