नवी दिल्ली : ‘आयुष्मान भारत आरोग्य विमा’ हा एक मोठा घोटाळा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली सरकारचे आरोग्य मॉडेल स्वीकारून त्याची देशभरात अंमलबजावणी करावी, असा जोरदार पलटवार आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी केला. आयुष्मानमधील २७,००० पैकी ७,००० रुग्णालये कागदोपत्रीच आहेत. त्यातच ४,००० रुग्णालयांनी आयुष्मान अंतर्गत कोणत्याही रुग्णालयात भरती केले नसल्याचा आरोप आपने केला.
दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकारने राजकीय स्वार्थापोटी ‘आयुष्मान भारत आरोग्य विमा’ योजना लागू केली नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केला आहे. आपच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पलटवार केला. मोदींच्या टीकेचा समाचार घेत त्या म्हणाल्या की, आरोग्य हा आमच्या पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही दिल्लीकरांसाठी आदर्श मॉडेल लागू केले आहे. त्याची प्रशंसा संयुक्त राष्ट्राचे माजी प्रमुख कोफी अन्नान यांनी सुद्धा केली होती.
पण या यउलट पंतप्रधानांनी ‘आयुष्मान भारत आरोग्य विमा’ हा एक मोठा घोटाळा सादर केला आहे. देशाच्या महालेखापरीक्षकांनी (कॅग) या घोटाळ्यावर भाष्य करण्याची मागणी कक्कड यांनी केली. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत लागू केलेल्या आरोग्य मॉडेलचे अध्ययन नरेंद्र मोदी यांनी करावे. त्यानंतर त्याची देशभरात अंमलबजावणी करावी, असा सल्ला कक्कड यांनी दिला. विशेष बाब अशी की, दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) आयोजित सभेत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली व पश्चिम बंगालने आयुष्मान भारत योजना लागू केली नसल्याचा आरोप केला.
त्याबद्दल मोदींनी या दोन्ही राज्यांतील ७० हून अधिक वयाच्या वृद्धांची माफी मागितली. पण, मोदींनी सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावरून चुकीचे बोलणे व त्याचे राजकारण करणे योग्य नाही, असा पलटवार आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केला. दुसरीकडे, दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू न केल्याबद्दल भाजपच्या खासदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.