मुंबई : अयोध्यातील राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉनला नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी राम मंदिर प्रवेशाबाबत फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. आता ॲमेझॉनवर अयोध्या राम मंदिर प्रसाद नावाने मिठाई विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉनला “श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद” या नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. ॲमेझॉन राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली मिठाई विकून फसवा व्यापार करत असल्याची तक्रार व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सकडून करण्यात आली होती. या तक्रारीवर आधारित कारवाई करण्यात आली आहे.
ॲमेझॉनला केंद्र सरकारची नोटीस
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉनला ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ या नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस बजावली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉनला नोटीस जारी करत सात दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे. नाहीतर ॲमेझॉनविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदीनुसार आवश्यक कारवाई सुरू करण्यात येईल अशी माहिती सरकारी निवेदनात समोर आली आहे. मुख्य आयुक्त रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ नावाने ‘WWW.Amazon.in’ वर मिठाईच्या विक्रीच्या संदर्भात ॲमेझॉन सेलर सर्विस प्रा. ली. विरुद्ध कारवाई सुरू केली आहे.