मेलबर्न: ऑस्ट्रेलियात सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान १६ वर्षांची वयोमर्यादा निश्चित करण्यात येणार आहे. याचाच अर्थ १६ वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. यासंदर्भात प्रस्तावित कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोशल मीडिया कंपन्यांवर टाकण्यात
आली आहे.
पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी गुरुवारी या प्रस्तावित कायद्याची घोषणा केली. सोशल मीडियामुळे आमच्या मुलांचे नुकसान होत आहे आणि आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही १६ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही, असा कायदा करणार आहोत. येत्या १८ तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात या कायद्याचे विधेयक मांडण्यात येईल. कायदा मंजूर झाल्यानंतर १२ महिन्यांनंतर वयाच्या अटीची तरतूद लागू होईल, असे अल्बानीज यांनी सांगितले.
एक्स, टिकटॉक, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया कंपन्यांना आपल्या प्लॅटफॉर्मचा १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वापर करण्यापासून कसे रोखता येईल, याकरिता आवश्यक बदल करण्यासाठी हा १२ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हजारो पालकांसोबत चर्चा करून हा कायदा आणण्यात येत असल्याचे अल्बानीज म्हणाले, या कायद्याचे उल्लंघन केल्यास कंपन्यांना दंड केला जाईल. पालक किंवा मुलांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
फेसबुक, इन्स्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाचे सुरक्षा प्रमुख एंटीगोन डेव्हिस यांनी वयोमयदिबाबत आणलेल्या कोणत्याही कायद्याचे कंपनी पालन करेल, असे सांगितले. त्याचवेळी वयोमर्यादेच्या अटीची अंमलबजावणी कशी करणार, यावर चर्चा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. जगभरातील अनेक देश सोशल मीडियाच्या दुरुपयोगाबाबत चिंतीत असून अल्पवयीनांमधील सोशल मीडियाचा वापर कसा नियंत्रित करता येईल, याचा विचार करत आहेत.