नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या आतिशी यांना केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी २१ तारखेचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या पत्रात त्यांच्या शपथविधीसाठी २१ सप्टेंबर या तारीख निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आपचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे मावळते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला राजीनामा गेल्या मंगळवारी उप-राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना दिला. त्यानंतर उप-राज्यपालांनी तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. अशातच आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आतिशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर, त्यांनी राज्यात सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला आहे. पण, विधिमंडळ दलाने नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथ सोहळ्यासाठी कोणतीही तारीख दिलेली नाही. पण, राज्यपाल सक्सेना यांनी आतिशी यांच्या शपथविधीसाठी २१ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते सुरक्षा व शासकीय सुविधासुद्धा सोडणार आहेत.