NASA : बोईंग स्टारलायनर या अंतराळयानाच्या चाचणीसाठी केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या नासामधील भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर हे अडीच महिन्याहून अधिक काळ अंतराळातच अडकले आहेत. आता त्यांचा परतीचा प्रवास आणखी लांबणीवर गेला आहे.
नासाचे अधिकारी बिल नेल्सन यांनी म्हटले की, ‘बोइंगचे स्टारलाइनर क्रूशिवाय पृथ्वीवर परत येईल. सुनीता आणि विल्मोर 13 जून रोजी परतणार होते, परंतु अंतराळ यानात तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या परतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. उड्डाण धोकादायक आहे, अगदी सुरक्षित आणि अचूकतेने चाचणी केलेली उड्डाणे पूर्णपणे सुरक्षितही मानली जाऊ शकत नाहीत’.
स्टारलाइनर अंतराळ यानाला प्रक्षेपित झाल्यापासून अनेक समस्या होत्या. यामुळे 5 जूनपूर्वीही अनेक वेळा प्रक्षेपण फेल झाले होते. प्रक्षेपणानंतरही अंतराळयानामध्ये समस्या असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हेलियम गळती होत असल्याचे नासाने सांगितले होते. अंतराळ यानामध्ये अनेक थ्रस्टर्स असतात. त्यांच्या मदतीने अंतराळयान आपला मार्ग आणि वेग बदलते. हेलियम वायूच्या उपस्थितीमुळे रॉकेटवर दाब निर्माण होतो. त्याची रचना मजबूत राहते, ज्यामुळे रॉकेटला त्याच्या उड्डाणात मदत होते.
प्रक्षेपणानंतर 25 दिवसांत अंतराळयानाच्या कॅप्सूलमध्ये 5 हीलियम गळती झाली. ज्यामुळे 5 थ्रस्टर्सने काम करणे थांबवले होते. याव्यतिरिक्त, प्रोपेलेंट वाल्व पूर्णपणे बंद करणे शक्य नव्हते. त्याशिवाय, अंतराळात उपस्थित असलेले क्रू आणि अमेरिकेत बसलेले मिशन मॅनेजर ते दुरुस्त करू शकत नाहीत.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी तिसऱ्यांदा अंतराळ स्थानकात प्रवेश करून एक आगळा विक्रम नोंदवला आणि अंतराळ संशोधकांबरोबरच समस्त भारतीयांची मनेही अभिमानाने फुलून आली. त्यांचा मुक्काम लांबल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.