Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून आज शपथ घेतली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी मराठी भाषेत शपथ घेतली. चव्हाण यांना राज्यसभा सभापती जगदिप धनखड यांनी संसद भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, आपण महाराष्ट्राचे आहोत, मराठी लोकांचं मला प्रेम मिळालं आहे, म्हणून मराठीतून शपथ घेतली आहे. मला विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली. चार ही सभागृहात काम करण्याची मला संधी मिळाली आहे. वेगळा अनुभव मला राज्यसभेत येईल. योगायोग की आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांसोबत शपथ घेण्याची संधी मिळाली आणि आज भाजपचा स्थापना दिवस आहे. असं अशोक चव्हाण म्हणाले.
भिवंडी आणि सांगली येथील लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना ते म्हणाले, विनाकारण काही बातम्या दाखवल्या गेल्या आहेत. त्यामध्ये माझा दुरान्वये संबंध नाही. त्यांचे अपयश झाकण्याकरिता किंवा कांग्रेस हायकमांड समोर काहीतरी सांगण्याचा हा प्रयत्न आहे. सांगलीची जागा परंपरेनं वसंतदादा पाटील यांच्या नावानं ओळखली जाते आणि भिवंडीची जागा कोकणात एकमेव आहे, मी असे निर्णय कधी घेतले नाहीत.
काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, मी भाजपमध्ये येताना कोणालाही सोबत घेऊन आलो नाही. याबाबत मला जास्त काही माहीत नाही. लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालानंतर भाजपची सत्ता १०० टक्के येणार आहे. असंही चव्हाण म्हणाले.