नवी दिल्ली: दिल्ली अबकारी धोरण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांच्या जामीनाला तूर्त स्थगिती दिली असून निर्णय राखून ठेवला आहे. दोन ते तीन दिवसांत याबाबत निर्णय होईल, असे मानले जात आहे. तोपर्यंत केजरीवाल यांना तिहार तुरुंगातच राहावे लागणार आहे. गुरूवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. याप्रकरणी ईडीने शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने ईडीच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले.
ईडीचा दावा आहे की, आम्हाला अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्याची पूर्ण संधी देण्यात आली नाही, त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाच्या जामीन निर्णयाला स्थगिती देण्यात यावी. अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी ईडीच्या वकिलांना सल्ला दिला की, तुम्ही न्यायालयाचा निर्णय आदराने स्वीकारा. उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच अरविंद केजरीवाल यांची आज सुटका होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. सीएम केजरीवाल यांना दिलेल्या जामिनाला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत ट्रायल कोर्टाचा आदेश लागू केला जाणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.