बंगळुरू : कर्नाटकमधील बहुचर्चित सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी तथा धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) खा. प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात बंगळुरू स्थित लोकप्रतिनिधी संबंधित प्रकरणांचा निवाडा करणाऱ्या विशेष न्यायालयाने रविवारी अटक वॉरंट जारी केले. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. लैंगिक शोषणाच्या या प्रकरणात प्रज्वलचे वडिल तथा होलेनरसीपुराचे आमदार एच. डी. रेवन्ना हे सुद्धा आरोपी आहेत.
कर्नाटकातील हसन जिल्ह्याचे खासदार तथा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत ‘एनडीए’ आघाडीच्या तिकिटावर नशीब आजमावणारे जेडीएसचे नेते प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल केले आहेत. प्रज्वल यांच्या विरोधात कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी शिफारस केल्यानंतर राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून चौकशी सुरू केली आहे. त्यातच इंटरपोलने सुद्धा त्यांच्या विरोधात ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी केली आहे. प्रज्वल सध्या फरार आहेत.
कारवाईच्या भीतीपोटी त्यांनी विदेशात धूम ठोकली आहे. पण आता बंगळुरू स्थित लोकप्रतिनिधी संबंधित प्रकरणांचा निवाडा करणाऱ्या विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे मायदेशी परतताच त्यांना बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे. या वॉरंटमुळे त्यांच्या समोरील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान तथा जेडीएसचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. रेवन्ना यांच्या विरोधात महिला लैंगिक शोषण व अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.