गंगटोक : सिक्कीममध्ये गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. भूस्खलनप्रभावित मंगन जिल्ह्यातील लाचुंगमध्ये अडकलेल्या २०० पर्यटकांना बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर या भागात अजूनही जवळपास एक हजार पर्यटक अडकून पडल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. जिल्हा प्रशासन, सीमा रस्ते संघटना (बीआरओ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि अन्य स्वयंसेवकांद्वारे युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली जात आहे. १२ जूनपासून सुरू असलेल्या पावसामुळे मंगनच्या अनेक भागांत भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, बहुतांश भागाचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद पडल्याने मोठ्या संख्येने पर्यटक अडकून पडले आहेत.