हैद्राबाद: तुम्हीही ओयो रूम बुक करत असाल, तर सावधान. तेलंगणातील हैद्राबादमधून अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. शमशाबाद येथील ओयो हॉटेलमध्ये प्रत्येक खोलीत आणि शौचालयात गुप्त कॅमेरे बसवण्यात आले होते. जेव्हा जेव्हा एखादे जोडपे येथे राहायला येत होते, तेव्हा हॉटेलचे कर्मचारी त्यांचे खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद करायचे. त्यानंतर ते जोडप्यांना व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून ब्लॅकमेल करायचे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायचे.
हा प्रकार बराच काळ चालू होता. समाजात कलंक लागेल आणि घरी माहिती कळेल या भीतीचा विचार करून, जोडपे हॉटेलवाल्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देत होते, जेणेकरून त्यांनी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो लीक होऊ नयेत. मात्र, यावेळी हॉटेलमालकांचे नशीब खराब होते. नेहमीप्रमाणे येथे राहण्यासाठी आलेल्या जोडप्याचे खासगी क्षणही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यात टिपले.
हे जोडपे बाहेर पडताच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे खासगी व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या फोनवर पाठवले. त्यानंतर आम्हाला पैसे दे, नाहीतर तुझ्या घरी सांगू, अशी धमकी दिली. हे सर्व पाहून जोडपे घाबरले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आधी त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना हे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मान्य न केल्यावर त्या जोडप्याने त्यांना विचारले की, तुम्ही हे कसे करू शकता? असे करणे हा गुन्हा आहे. आम्ही इथे आमच्या मर्जीने हॉटेलमध्ये आलो आहोत. खोलीत कॅमेरा लावून तुम्ही आमचे खाजगी क्षण कसे टिपले?
यावर हॉटेल व्यवस्थापक ,म्हणाला की, आम्हाला हे सर्व माहित नाही. तुम्ही पैसे न दिल्यास तुमचे व्हिडिओ आणि फोटो तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि सोशल मीडियावर व्हायरल केले जातील. त्यानंतर या जोडप्याने पोलिसांना कळवायचे ठरवले. हॉटेल मॅनेजरला वाटले की, हे जोडपे पैसे देईल, पण झाले उलटे.
छापा टाकून आरोपी व्यवस्थापकाला अटक
त्यानंतर हे जोडपे थेट पोलीस ठाण्यात गेले. येथे दाम्पत्याने हॉटेल व्यवस्थापकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दाम्पत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. अचानक हॉटेलवर छापा टाकला. येथे पोलिसांना अनेक खोल्यांमधून सीसीटीव्ही कॅमेरे सापडले, जे गुपचूप लावण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ हॉटेल व्यवस्थापकाला अटक केली. गणेश असे आरोपीचे नाव असून तो ओंगोले येथील रहिवासी आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी त्याच्याकडून अनेक अश्लील व्हिडिओही जप्त केले आहेत. सध्या याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.