नवी दिल्ली: बाळाला किंवा मुलाला तापाचे इंजेक्शन डॉक्टरांकडून देऊन आणता तेव्हा अंगावर काटा येतो. औषध घेण्याचा यापेक्षा कमी भीतीदायक, कमी वेदनादायक मार्ग नाही का, असा प्रश्न आपल्याला पडतो. आता ‘फ्लू मिस्ट’ नावाच्या नाकावाटे घेण्याच्या लसीला (स्प्रे) नुकतीच अमेरिकेत मंजुरी मिळाली आहे. त्याहूनही चांगली गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी या वेळेपर्यंत ती अमेरिकेतील औषधी दुकानांत प्रिस्क्रिप्शनसह विकत घेता येईल.
कोणती सुई टोचायची नाही की वेदना नाहीत. ‘ही नवी लस सुरक्षित आणि प्रभावी आहे आणि इन्फ्लुएन्झा लस घेण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध करते. या लसीमुळे रुग्ण आणि कुटुंबांसाठी अधिक सोय, लवचिकता मिळते,’ असे एफडीएच्या लस केंद्राचे संचालक डॉ. पीटर मार्क्स यांनी सांगितले. परंतु नाकाद्वारे लस ही टोकदार सुई आणि वेदना टाळण्याचा एकमेव मार्ग नाही.
इंजेक्शनसाठी ध्वनीचाही वापर
ऑक्सफर्ड विद्यापीठातील डार्सी डन-लॉलेस आणि त्यांचे सहकारी ध्वनी (अल्ट्रासाऊंड) वापरून लस त्वचेतून देण्याचा प्रयोग करीत आहे. उंदरांवरील अभ्यासादरम्यान लसीचे रेणू आणि प्रथिने यांचे द्रव मिश्रण त्वचेवर टाकण्यात आले. नंतर ते दीड मिनिटांच्या ध्वनिलहरींच्या संपर्कात आले.
हवेच्या दाबाने इंजेक्शन
अमेरिकेतील डॅल्लास येथील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी एमओएफ-जेट शोधून काढले आहे, जे दाबयुक्त वायूचा वापर करून त्वचेद्वारे शरीरात शोषली जाणारी पावडररूपी लस विकसित केली आहे. हा एकप्रकारे ‘टॉय गन’चा एक प्रकार आहे ज्याला ‘नर्फ बुलेट’ म्हणतात. मुख्य संशोधक जेरेमिया गॅसेन्समिथ यांनी साथीच्या आजाराच्या काळात ही कल्पना विकसित केली. यालिनी विजेसुंदर या पदवीधर विद्यार्थिनीने प्रयोगशाळेत दाबयुक्त वायू (कॉम्प्रेस्ड गॅस) चलित जेट इंजेक्शनवर त्यांचे हे संशोधन आधारित आहे, हे विशेष.
पावडरयुक्त लस
‘हे पावडरयुक्त इंजेक्शन स्वस्त आहे आणि न्यूक्लिक अॅसिडसारख्या जैविक पदार्थांचे संरक्षण करते. अनेक द्रव लसींना आवश्यक असलेल्या अत्यंत थंड तापमानाची गरजही लागत नाही. सर्वसाधारण तापमानावर लस पावडरच्या स्वरूपात संग्रहित करता येते. जर ते कार्बनने (सीओटू) शूट केले तर ते पेशीमध्ये लवकर पसरते. जर नियमित हवेच्या दाबाचा वापर केला, तर औषधांचा परिणाम होण्यास चार ते पाच दिवस लागतील,’ असे विजेसुंदर यांनी सांगितले. त्वचेच्या कर्करोगाचा सर्वात गंभीर प्रकार असलेल्या मेलेनोमावर उपचार करण्यासाठी आता एमओएफचा वापर केमोथेरप्यूटिक्स देण्यासाठी केला जात आहे.
वेदनारहित पॅच
पश्चिम आफ्रिकेतील गॅम्बिया येथे अलीकडील लसीच्या चाचणीत दिसून आले आहे की, वेदनारहित सूक्ष्म सुयांचे त्वचेचे पेंच आश्चर्यकारक कार्य करू शकतात. हे चिकटलेल्या प्लास्टरसारखे दिसते, ते साठवणे आणि दुर्गम ठिकाणी नेणे सोपे आहे आणि जगभरातील मुलांना संसर्गजन्य आणि घातक विषाणूजन्य रोग गोवरपासून लसीकरण करण्यात मदत करू शकते. पेंच हाताला चिकटून राहतो तर सूक्ष्म सुया त्वचेतून वेदनारहित लस आत ढकलतात.