मुंबई : नेपाळमध्ये बस अपघात होऊन त्यात २४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल(दि.२३) घडली. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील २४ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने आज शनिवारी २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून ते त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यात येणार आहेत.
मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचं विमान पाठवणार..
जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत त्यांच्याकडून मदतीच्या कामाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचंही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जाणारा आहेत.
बस दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर..
नेपाळमध्ये शुक्रवारी (दि.२३) झालेल्या बस दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर पोहोचली आहे. महामार्गावरून जाणारी बस नियंत्रणाबाहेर जाऊन मर्स्यांगडी नदीत पडल्याने हा अपघात झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी २४ मृतदेहांची ओळख पटली असून ते महाराष्ट्रातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. आता हे सर्व मृतदेह शनिवारी भारतीय हवाई दलाच्या विमानाने महाराष्ट्रात नेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे.