बंगळुरु : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्यांकडून हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याप्रकरणी निर्मला सीतारमण आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जनाधिकार संघर्ष परिषदेचे सह अध्यक्ष आदर्श आर. अय्यर यांनी सीतारामन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीच्या आधारावर केंद्रीय अर्थमंत्र्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी आमदार-खासदारांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणा-या विशेष न्यायालयाला केली होती.
सीतारामन यांच्यावर निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणीचा आरोप आहे. तसेच विशेष न्यायालयाने या याचिकेची दखल घेत बंगळुरुच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी एफआयआर नोंदवला आहे. यामुध्ये सीतारामन या प्रमुख आरोपी आहेत.
याबरोबरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, ईडी अधिकारी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपाचे राष्ट्रीय नेते, तत्कालीन भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील, बीवाय विजयेंद्र यांच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
सीतारामन यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी एप्रिल 2019 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या फर्मीकडून 230 कोटी रुपये आणि अरबिंदो फार्मसीकडून 49 कोटी रुपये इलेक्ट्रोल बॉंड म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्यात आली, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.