नवी दिल्ली: एमबीबीएसची पदवी असलेल्या देशातील प्रत्येक डॉक्टरला आता विशिष्ट ओळखपत्र (युनिक आयडी) देण्यात येईल. यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या पोर्टलवरील नोंदणी सुरू झाली आहे. इंडियन मेडिकल रजिस्टरमध्ये नोंदणी केलेल्या प्रत्येक एमबीबीएस डॉक्टरला पुन्हा एकदा नॅशनल मेडिकल रजिस्टरमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीची आधारसोबत पडताळणी केली जाईल. एकदा माहिती पडताळून झाल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला एक विशेष ओळखपत्र दिले जाईल.
नॅशनल मेडिकल रजिस्टरमधील काही माहिती सार्वजनिक असेल. म्हणजेच ती माहिती कोणीही बघू शकतो; परंतु काही माहिती ही वैद्यकीय संस्थांपुरतीच मर्यादित राहील. या नोंदणीसाठी डॉक्टरांना आधार कार्ड, एमबीबीएसच्या पदवीची डिजिटल प्रत, राज्य किंवा केंद्रीय वैद्यकीय परिषदेच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असेल. देशात एमबीबीएसची पदवी असलेले १३ लाखांहून अधिक डॉक्टर आहेत. मात्र, अनेक डॉक्टर परदेशात गेले आहेत, तर काहींचा वैद्यकीय परवाना हरवला आहे, तर काहींचा रद्द करण्यात आला आहे. अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांबाबतची नेमकी आकडेवारी या नोंदणी प्रक्रियेद्वारे स्पष्ट होईल, असा दावा करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी गत महिन्यात २३ तारखेला या नोंदणीसाठीचे पोर्टल सुरू केले होते.