नवी दिल्ली: टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया या खासगी विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी खुशखबर दिली आहे. एअर इंडियाने आपल्या सध्याच्या मोठ्या आकाराच्या विमानांमध्ये वायरलेस मनोरंजन सेवा अर्थात इन फ्लाइट वायरलेस मनोरंजन सेवा देण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या विमानांच्या ताफ्यात नुकतीच सादर करण्यात आलेली नवीन इन फ्लाइट मनोरंजन सेवा व्हिस्टा या लहान विमानांमध्येही उपलब्ध करून दिली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. काही विमानांमध्ये उड्डाणातील मनोरंजन प्रणालीमध्ये बिघाड आणि काम करत नसल्याच्या तक्रारी विमान प्रवाशांनी केल्या होत्या. विमान कंपनी आपल्या जुन्या ताफ्यात सुधारणा करण्याच्या आणि नवीन विमाने समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहे.
नुकत्याच सादर केलेल्या बी ७७७ आणि ए ३५० विमानांमध्ये वायरलेस मनोरंजन सेवा उपलब्ध होणार नाही. एअर इंडियाच्या नवीन मोठ्या विमानांमध्ये नवीन मनोरंजन प्रणाली आहेत. एअरलाइन्सकडे १४० विमाने कार्यरत आहेत. व्हिस्टासह प्रवासी त्यांच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मनोरंजन सामग्रीचा आनंद घेऊ शकतात. फ्लाइट ‘ट्रॅकिंग’साठी लाइव्ह मॅप डिस्प्लेदेखील असेल, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.