नवी दिल्ली : आज नवी दिल्ली येथे नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होत आहे. त्यात महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली आहे. अशातच, खासदार अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली आहे. निलेश लंकेंनी इंग्रजी भाषेतून घेतलेली शपथ सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे.
अहमदनगरची निवडणूक देशभर चर्चेचा विषय बनली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपा उमेदवार सुजय विखे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टीका केली होती. तसेच त्यांच्या शिक्षणावरूनही टीका केली होती.
खासदार महोदयांना हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे, अशी बोचरी टिका विखेंनी निलेश लंकेवर केली होती. त्याचसोबत लंकेंनी माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे, भलेही एक महिनाभर भोकमपट्टी करावी, पण इंग्रजीतून बोलून दाखवावे. इंग्रजीतून बोलून दाखविल्यास मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो, असं चॅलेंज सुजय विखेंनी निलेश लंकेना दिलं होतं. त्या टिकेला लंकेंकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आलं.
दिल्लीच्या संसदेत जाताना खासदार निलेश लंके यांनी पाय-यांवर डोकं टेकवलं. त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी सुरु असताना लंके यांचे नाव पुकारले, तेव्हा त्यांनी चक्क इंग्रजीतून शपथ घ्यायला सुरवात केली. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत सर्वांसमोर हात जोडले.