पंतप्रधान मोदींनी जानेवारी महिन्यात लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंगचा आनंद घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्कूबा डायव्हिंग केले. विशेष म्हणजे थेट भारतीय पारंपारिक पोशाखामध्ये स्कूबा डायव्हिंग करत पंतप्रधान समुद्राच्या तळाशी असलेली द्वारका पाहण्यासाठी पोहोचले होते. मोदींनी त्यांच्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन या द्वारका भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी द्वारकाधिश्वर मंदिराला भेट दिली. तिथे मनोभावे पुजा केल्यानंतर पंतप्रधान थेट समुद्राच्या तळाशी बुडालेल्या द्वारका शहराचे दर्शन घेण्यासाठी स्कूबा डायव्हिंग केले. मोदींनीच हे फोटो शेअर केले आहेत.
पारंपारिक पोशाखात स्कूबा डायव्हिंग
समुद्रातील द्वारकेच्या दर्शनासाठी जाताना पंतप्रधानांनी भगव्या रंगाचा कुर्ता म्हणजेच पारंपारिक भारतीय पोशाख केला होता. श्री कृष्णाचे प्रतिक असलेले मोराचे पिसंही मोदींनी सोबत नेल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. समुद्रामध्ये स्कूबा डायव्हिंग केल्याचे फोटो शेअर करत मोदींनी हा अनुभव दैवी होता असे म्हटले आहे. “समुद्रात द्वारकेच्या दर्शनाच्या वेळी मी पुरातन काळाशी कनेक्ट झाल्यासारखे मला वाटले. श्री कृष्णाची आपल्या साऱ्यांवर अशीच कृपा कायम राहू देत,” असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
जानेवारीत लक्षद्वीपला जाऊन आले मोदी
जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंग केले. लाइफ जॅकेट घालून समुद्रातून बाहेर येताना पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीपमधील फोटो चर्चेचा विषय ठरला होता. लक्षद्वीपमधील काही फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी समुद्रकिनाऱ्यावर खुर्चीवर बसून अथांग समुद्र न्याहाळताना, वाचन करताना पाहायला मिळाले होते.