नवी दिल्ली : इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवत दहशतवादी तळं उध्वस्थ केली. इराणच्या हल्ल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने आता इराणवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला. इराणच्या हल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं इराणच्या दहशतवादी स्थळांवर हल्ला चढवल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानची इराण विषयी काय भूमीका?
पाकिस्तानच्या मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं इराणमधील अनेक दहशतवादी तळंवर हल्ले केले. हा हल्ला कधी आणि कुठे करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. पाकिस्तानचा दावा आहे की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फोर्स यासारखे बलूच फुटीरतावादी दहशतवादी संघटना इराणमध्ये सक्रिय आहेत, जे पाकिस्तानविरोधी कारवाया करतात. या संघटना इराणमध्ये राहून पाकिस्तानविरुद्ध कट रचतात आणि हल्ले करतात. इराण अशा संघटनांना आश्रय देऊन मदत करतो, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, जेव्हा-जेव्हा पाकिस्ताननं इराणवर असे आरोप केले आहेत, तेव्हा-तेव्हा इराणनं नेहमीच पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
इराणची पाकिस्तान विषयी काय भूमीका?
इराणकडून अनेकवेळा सांगण्यात आले आहे की, पाकिस्तान आणि इराणच्या सीमा भागात जैश-अल-अदल दहशतवादी संघटना आहे. जैश-अल-अदल ही संघटना पाकिस्तानच्या भूमीवर आहे. ही संघटना सतत इराणच्या सीमा भागात हल्ला करत आहे. त्याविषयी अनेक वेळा इराणकडून पाकिस्तानला समज देण्यात आली. या संघटनेचा समूळ नाश करण्याचे आवाहन केले. मात्र, पाकिस्तानकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सध्या या दोन देशात अभूतपूर्व तणाव सुरू आहे. यापूर्वी दोन्ही देशांमधील संबंध फारसे चांगले नसले तरी याआधी परिस्थिती इतकी बिघडलेली नव्हती. इराणनं अनेकवेळा पाकिस्तानवर सीमेपलीकडून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा आरोप केला आहे.