Minor Rape Case : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणात जामीन मिळालेल्या आरोपीने पुन्हा त्याच मुलीचं अपहरण करून तिच्यावर महिनाभर बलात्कार केल्याची लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वीरनाथ पांडे असं या नराधमाचे नाव आहे. ही घटना उत्तर प्रदेश येथील भोजपूर जिल्ह्यात घडली आहे.
नेमकं काय घडलं?
अपहरण प्रकरणातील आरोपी काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटल्यानंतर तुरुंगातून बाहेर आला होता. आरोपी वीरनाथ पांडे याला पोलिसांनी मे २०२४ मध्ये एका १७ वर्षांच्या मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, त्याला काही दिवसांनी जामिनावर बाहेर काढण्यात आलं. पण जामिनावर सुटका झाल्यानंतर आरोपीनं पुन्हा त्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर महिनाभर बलात्कार केला.
मुलगी घराबाहेर पडताच पुन्हा केलं अपहरण
पीडित मुलगी ५ ऑगस्ट रोजी काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. त्यावेळी आरोपीने पुन्हा तिचं अपहरण करून जवळपास महिनाभर मुलीला स्वत:च्या ताब्यात ठेवलं. या काळात तिच्यावर त्यानं अनेक वेळा बलात्कार केला. २ सप्टेंबर रोजी आरोपीनं पीडित मुलीला जांगीगंज रेल्वे पोलीस स्टेशनजवळ सोडून दिलं आणि त्या ठिकाणाहून पळून गेला.
दरम्यान, नराधमानं सोडल्यानंतर पीडित मुलीनं लगेच पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. आरोपीनं महिनाभर लैंगिक अत्याचार केल्याचंही मुलीने सांगितलं. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता अनेक वेळा बलात्कार झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.