नवी दिल्ली: देशातील 4092 आमदारांपैकी जवळपास 45 टक्के आमदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. पक्षनिहाय विचार केल्यास भाजपच्या 1653 आमदारांपैकी 39 टक्के म्हणजे 638 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यापैकी 436 आमदार (26 टक्के) गंभीर आरोपांचा सामना करत आहेत. तर काँग्रेसच्या 646 आमदारांपैकी 339 आमदारांवर फौजदारी गुन्हे असून यापैकी 194 जणावर गंभीर आरोप आहेत. राज्यानुसार पाहिल्यास महाराष्ट्रातील 65 टक्के आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने 28 राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशच्या विधानसभेतील 4123 आमदारांपैकी 4092 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करत यासंबंधीचा अहवाल सादर केला आहे. 24 आमदारांचे प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करता आले नाही, कारण त्यांचे प्रतिज्ञापत्र हे अत्यंत खराब पद्धतीने स्कॅन करण्यात आले होते. तर विधानसभांमध्ये ७ जागा रिक्त आहेत. विश्लेषणानुसार 4092 आमदारांपैकी 1861 (45 टक्के) आमदारांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले आहे. यापैकी 1205 आमदारांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांविरोधातील अत्याचार यासारखे गंभीर आरोप आहेत.
याबाबतीत राज्यानुसार आंध्र प्रदेश हे आघाडीवर आहे. आंध्रातील 138 (79 टक्के) आमदारांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे घोषित केलेले आहे. यापाठोपाठ केरळ आणि तेलंगाणातील प्रत्येकी 69 टक्के आमदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यानंतर बिहारमधील 66 टक्के, महाराष्ट्रातील 65 टक्के आणि तामिळनाडूतील 59 टक्के आमदारांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केलेले आहे. महाराष्ट्रातील 65 टक्के आमदारांपैकी 41 टक्के आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पक्षनिहाय विचार केल्यास तेलुग तेलुग देसम पक्षाच्या 134 आमदारांपैकी 115 जणांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे असल्याचे सांगितले आहे. यापैकी 82 आमदार हे गंभीर स्वरूपाच्या आरोपांचा सामना करत आहेत. तामिळनाडूतील द्रमुकच्या 132 पैकी 98, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या 230 पैकी 95, आपच्या 123 पैकी 69, समाजवादी पक्षाच्या 110 पैकी 68 आमदारांनी आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे. विश्लेषणानुसार एकूण आमदारांपैकी 54 जण खुनाच्या खटल्याचा सामना करत आहेत. तर 226 आमदारांवर खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. 127आमदार महिलांविरोधातील अत्याचाराच्या प्रकरणात अडकलेले आहेत.