Lok Sabha Election Exit Poll Results : लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यातील मतदान संपल आहे. आता 4 जूनला निकाल लागणार आहे, मात्र त्याआधीच विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, बहुतांश एक्झिट पोलमध्ये देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा नरेंद्र मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नाही. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला मिळून साडेतीनशेच्यावर जागा मिळताना दिसत आहेत.
टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळण्याची शक्यता आहे. टीव्ही नाईन एक्झिट पोलमधील आकडेवारी पाहिल्यास देशातील ५४३ जागांपैकी ३५३ ते ३६८ जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या खात्यात ११८ ते १३३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर इतर पक्ष ४३ ते ४८ जागा जिंकण्याची शक्यता आहे.
टीव्ही नाईन एक्झिट पोलममध्ये मात्र भाजपा आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महायुतीला २२ आणि महाविकास आघाडीला २५ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यात १ जागा जाऊ शकते.
रिपब्लिक-PMARQ च्या एक्झिट पोलनुसार देशात भाजपाच्या नेतृत्वाखालील भाजपला ३५९ आणि इंडिया आघाडीला १५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला २७ ते ३२ आणि महाविकास आघाडीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना १ जागा मिळू शकते.
इंडिया न्यूज-डी डायनॅमिक्सच्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३७१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला १२५ जागा मिळण्याची शक्यता आहे.