छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये मोठा अपघात घडला आहे. लोखंडी पाइप बनवणाऱ्या कारखान्याची चिमणी कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ८ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चिमणी कोसळल्याने घटनास्थळी ढिगाऱ्याखाली २५ जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यातील रामबोड गावामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तातडीने बिलासपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्याला सुरुवात झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि प्रशासन कारखान्याजवळ दाखल झाले असून अपघातामध्ये मृताचा नेमका आकडा अद्यापही अस्पष्ट असल्याचे म्हटले जात आहे. प्राथमिक तपासावरुन एकूण ८ कामगारांचा अपघाता मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर २ कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये बचावकार्य सुरु असल्याचे दिसत आहे.
..आणि चिमणी अचानक कोसळली
लोखंडी पाइप बनवणारी चिमणी अचानक कोसळली. त्याखाली असलेले अनेक कामगार चिमनीखाली दबून जखमी झाले. चिमणी कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले गेले. एकूण २५ पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे समजते. अडकलेल्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.