पाटणा : अहमदाबादहून पाटण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये 27 वर्षीय व्यक्तीला शनिवारी (30 सप्टेंबर) पाटणा येथे ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख ‘स्पेशल नीड” असलेली व्यक्ती म्हणून करण्यात आली आहे, म्हणजे त्याची काळजी घेण्यासाठी कोणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे. ही घटना भारतीय फ्लाइट 6E 126 मध्ये घडली.
बिहारची राजधानी पाटणा येथे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद कमर रियाझ असे आहे. या व्यक्तीने फ्लाइटचे उड्डाण झाल्यानंतर स्वत:ला वॉशरूममध्ये कोंडून घेतले. विमान पाटण्यात उतरताच या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाटणा विमानतळाचे एसएचओ विनोद पीटर यांनी सांगितले की, ‘विमानकंपनीने विमानात गोंधळ घातल्याबद्दल आणि गैरप्रकार केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.’
आरोपी मानसिक आजाराने त्रस्त : पोलीस
प्राथमिक तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची वैद्यकीय कागदपत्रे तपासण्यात आली आणि त्याच्या भावाचा जबाब नोंदवण्यात आला. या आधारे फ्लाइटमध्ये गोंधळ घालणारी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. एसएचओ विनोद पीटर यांनी सांगितले की, आरोपी व्यक्ती आपल्या भावासोबत अहमदाबादहून पाटण्याला येत होता. यादरम्यान त्यांनी फ्लाइटमध्ये गोंधळ घातला.
पाटण्याला उपचारासाठी येत होते
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रियाझ हा व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचा मोठा भाऊ अहमदाबादमध्ये राहतो, तेथून तो आपल्या भावासोबत पाटण्याला येत होता. आजारपणावर त्यांना पाटण्यात उपचार घ्यावे लागतात. सध्या रियाझवर पाटण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसएचओ म्हणाले की, सध्या पोलिस रियाजच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत.