बंगळुरू : लैंगिक शोषणाचे आरोप होताच एक महिन्यापूर्वी विदेशात पलायन केलेले कर्नाटकातील हसन जिल्ह्याचे खासदार प्रज्वल रेवन्ना हे ३१ मे रोजी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीचा सामना करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. प्रज्वल रेवन्ना मायदेशी परतण्याविषयी धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
प्रज्वल रेवन्ना यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला. कन्नड वृत्तवाहिनी ‘एशियानेट सुवर्णा’ वरून तो प्रसारित करण्यात आला. यात प्रज्वल म्हणतात की, मी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता एसआयटीपुढे हजर राहणार आहे. माझ्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांचा मी सामना करीत तपासात सहकार्य करणार आहे. माझ्यावर आतापर्यंत खोटे आरोप झाले; पण मी न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून खोट्या खटल्यांमधून नक्कीच बाहेर पडणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी परतल्यानंतर सर्व काही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रज्वल रेवन्ना म्हणाले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू तथा हसन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. हसनमधील मतदान पार पडल्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच २७ एप्रिल रोजी प्रज्वल यांनी जर्मनीला धूम ठोकली. खासदार व आमदारांविरोधातील खटल्यांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाने १८ मे रोजी रेवन्नांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.