मेरठ : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची धक्कादायक घटना मेरठ शहरातील मोदीपुरम येथील जनता कॉलनीत शनिवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ४ चिमुकल्यांचा मृत्यू झाला, तर पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सारिका (वय १०), निहारिका (वय ८), गोलू (वय ६) आणि कल्लू (वय ५) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर जॉनी (वय ४१) आणि बबिता (३७, सर्व, रा. सिखेडा, मुझफ्फरनगर) अशी गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
जॉनी हा मजूर म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी जॉनी हा आपल्या कुटुंबासह कामानिमित्त मेरठ शहरात गेला होता. तो मोदीपुरम येथील जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. शनिवारी (ता २३) सायंकाळी जॉनी आणि त्याची पत्नी घरकामात व्यग्र होते. त्याचवेळी मुले समोरील खोलीत खेळत होती.
जॉनीने त्याचा मोबाइल फोन मुलांना चार्जिंग करण्यासाठी सांगितला होता. मुलांनी मोबाइल चॉर्जिंगला लावताच अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून जॉनी आणि बबिता यांनी स्वयंपाक घरातून खोलीकडे धाव घेतली. या स्फोटामुळे घराला भीषण आग लागली. दोघांनीही जळालेल्या अवस्थेत मुलांना आगीतून बाहेर काढले. मात्र, मुलांना वाचवताना बबिता आणि जॉनी दोघेही गंभीररित्या भाजले.
दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चारही मुलांचा मृत्यू झाला. सध्या जॉनी आणि बबिता दोघांनाही दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.