पुणे : भारतीय वंशाचे असलेल्या डॉक्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी, आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक गोष्टींबाबतहा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय वंशाचे मात्र अमेरिकेत असलेले रिचमंड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु यांनी हि तक्रार दिली आहे. यावरून कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाकडून या प्रकरणी या तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना समन्स बजावण्यात आले आहे. याप्रकरणी न्यूयॉर्कचे वकील रवी बत्रा यांनी या केसला ‘निरर्थक केस’ अशी टीका केली आहे. या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस एम. श्वाब यांचेही नाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह अनेकांकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कॅश ट्रान्स्फर केली जात आहे. तसेच राजकीय विरोधकांविरोधात पेगासस स्पायवेअरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात अडकले आहेत, असा दावा या भारतीय वंशाच्या डॉक्टरने केला आहे. २४ मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणी न्यायालयाकडून २२ जुलै रोजी समन्स जारी करण्यात आले होते. भारतातही परदेशातील या न्यायालयाकडून ४ ऑगस्ट रोजी हे समन्स पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, याबाबत रवी बत्रा म्हणाले की, या प्रकरची केस दाखल करुन लोकेश व्युरुने वेळ वाया घालवला आहे. या प्रकरणात त्यांनी ५३ पानांची तक्रारी दाखल करुन फेडरल न्यायालयांचा गैरवापर करत आहेत. यामुळे भारताची बदनामी आणि अपमान करण्यासाठी त्यांनी विदेशी सार्वभौम कायद्याचा गैरवापर केला असल्याची टीका करण्यात आली आहे. ही केस निरर्थकही आहे त्यामुळेच एकही वकील यावर त्यांची बाजू मांडायला तयार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.