J.P. Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय आणि कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. भाजपने सोशल मीडिया पोस्टद्वारे एससी-एसटी समुदायाच्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.
रविवारी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोग आणि बंगळुरू पोलिसांकडे आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत अहवाल दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष रमेश बाबू यांनी तक्रारीत म्हटले आहे की, राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची ॲनिमेटेड पात्रे दाखवण्यात आली होती. या क्लिपमध्ये एससी, एसटी, ओबीसी समाज हे घरट्यातील अंड्यांसारखे दाखवण्यात आले असून राहुल गांधी या घरट्यात मुस्लिम समाज नावाची मोठी अंडी घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुस्लिम समाजाच्या अंड्यातून उबवलेल्या कोंबड्याला सर्व निधी दिला जात आहे, आणि हे पिल्लू नंतर एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला घरट्यातून बाहेर काढत आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे, असं रमेश बाबू यांनी म्हटलं आहे.