नवी दिल्ली: भाजप आणि काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार आहेत. दरम्यान, या आठवड्याच्या अखेरीस सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. निवडणूकपूर्व बैठकांची फेरीही 13 मार्चपर्यंत संपणार आहे. त्यानंतर कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात. यावेळीही सार्वत्रिक निवडणुका सात-आठ टप्प्यात होऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाने विविध राज्यांचा दौरा केला आहे. आयोग 11 ते 13 मार्च दरम्यान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी निवडणूक आयोग राज्यात कधी निवडणुका होऊ शकतात, याचेही मुल्यांकन करत आहे. या भेटीनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
बोर्डाच्या परीक्षा आणि सणांचा विचार करून तारखा ठरवल्या जाणार
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख 10 मार्च रोजी जाहीर करण्यात आली. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांत निवडणुका झाल्या. तर 23 मे रोजी मतमोजणी झाली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोर्डाच्या परीक्षा, सण आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची उपलब्धता लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा ठरवल्या जात आहेत. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिताही लागू होणार आहे. या निवडणुकीत सुमारे 97 कोटी मतदार मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी आयोग मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी अनेक मोठी पावले उचलणार आहे. गेल्या वेळी 67.1 टक्के मतदान झाले होते.
ओडिशा-आंध्र प्रदेशसोबत काश्मीरचीही निवडणूक होणार का?
लोकसभा निवडणुकीसोबतच ओडिशा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांचे कार्यक्रमही येणार आहेत. मात्र निवडणूक आयोग जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यानंतर याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोग लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका घेण्याच्या पर्यायावरही विचार करत आहे.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी 14-15 मार्च रोजी बैठक
दरम्यान, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांची निवृत्ती आणि अरुण गोयल यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली रिक्त पदे भरण्यासाठी 15 मार्चपर्यंत दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सदस्यांच्या सोयीनुसार निवड समितीची 14 किंवा 15 मार्च रोजी बैठक होऊ शकते. 15 मार्चपर्यंत नियुक्त्या होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.