छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जांजगीर येथील घटनेत विहिरीत विषारी वायू गळतीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर कोरबा येथे विहिरीत पडलेल्या वडिलांना वाचवण्यासाठी मुलीने विहिरीत उडी मारली होती, त्यानंतर कुटुंबातील आणखी दोन जण विहिरीत उतरले. त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी ५ जूलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जांजगीरमध्ये चंपा येथे घडली.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत पडलेली लाकडं काढण्यासाठी एक व्यक्ती विहिरीत उतरला होता. मात्र, विहिरीत विषारी वायू असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी चारजण एक एक करून विहिरीत खाली उतरले, मात्र, त्यांचाही विषारी वायुमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
विषारी वायुमुळे एकापाठोपाठ एक विहिरीत पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि बिररा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. एसडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे.
दुसऱ्या घटनेत कोरबा जिल्ह्यातील कटघोरा पोलीस ठाण्यांतर्गत जुराली गावातील डिपारापारा येथे विहिरीत बुडून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत वडिल विहिरीत पडल्यानंतर मुलीने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील इतर दोन सदस्यही विहिरीत उतरले. मात्र, त्या सर्वांचा मृत्यू झाला. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आहे.