Chhattisgarh Vidhan Sabha : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने ५४ जागा मिळवत काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. तर २०१८ च्या विधानसभेत राज्यात ६८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला ३५ जागांवर समाधान मानावे लागले. तर गोंडवाणा गणतंत्र पार्टी (जीजीपी) ला एका वर विजय मिळवता आला होता. माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी स्थापन केलेल्या जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) आणि बसपाला एकही जागा मिळवता आली नव्हती.
छत्तीसगड विधानसभेत ९० आमदार आहेत. त्यापैकी ७२ आमदार हे कोट्यधीश आहेत. यामध्ये सर्वाधिक आमदार हे भाजपचे आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि छत्तीसगड इलेक्शन वॉचने आमदारांकडून दाखल निवडणूक प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करत ही माहिती दिली.
भाजपचे भवन बोहरा हे सर्वात श्रीमंत आमदार असून ३३.८६ कोटींची संपत्तीचे मालक आहेत. मावळते मुख्यमंत्री व काँग्रेस नेते भूपेश बघेल हे ३३.३८ कोटी संपत्तीसह दुसऱ्या तर भाजपचे अमर अग्रवाल हे २७ कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. जिंकलेल्या आमदारांची सरासरी संपत्ती ५.२५ कोटी रुपये आहे. २०१८ च्या विधानसभेवेळी सरासरी संपत्तीचा आकडा ११.६३ कोटी होता.
काँग्रेसच्या रामकुमार यादव यांनी सर्वात कमी १० लाख रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. यापाठोपाठ भाजपच्या रामकुमार टोप्पो आणि गोमती साय यांनी अनुक्रमे १३.१२ आणि १५.४७ लाख रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. ९० पैकी ३३ आमदारांचे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. ५४ आमदारांनी पदवी किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेले आहे. दोन जणांनी डिप्लोमा केलेला असून फक्त एका आमदाराने आपण साक्षर असल्याचे म्हटले आहे.