चेन्नई: अवघ्या काही दिवसांत हातात पदवी येईल, मोठ्या कंपनीत नोकरी लागेल आणि घराण्याचे नाव उज्ज्वल होईल… अशा अनेक स्वप्नांची शिदोरी घेऊन गेलेल्या महाराष्ट्रातील भावी अभियंत्यांवर काळाने झडप घातली आहे. चेन्नईच्या ‘गोल्डन बीच’वर पर्यटनासाठी गेलेल्या 15 विद्यार्थ्यांपैकी 7 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यात जळगाव जिल्ह्यातील जय नरेंद्र पाटील या तरुणाचाही समावेश असल्याची भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील 15 हुशार विद्यार्थी ‘कॉग्निझंट’ या नामवंत आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी चेन्नईला गेले होते. शनिवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी हे सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर गेले. या किनाऱ्यावर अनपेक्षित लाटा उसळतात. विद्यार्थी सेल्फी घेण्यात मग्न असतानाच एक लाट आली आणि या तरुणांना खोल समुद्रात ओढून नेले.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सात विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. यामध्ये भंडारा येथील मयूरी चौधरीसह विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील मुला-मुलींचा समावेश आहे. जळगावचा जय पाटील अद्याप बेपत्ता असून, तमिळनाडूचे कोस्टल गार्ड, हेलिकॉप्टर आणि फायर रेस्क्यू टीम युद्धपातळीवर त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तमिळनाडू सरकार आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहेत. बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे काम थांबवू नये, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे.




