Pune Crime : सासवड, (पुणे) : अगोदरच्या दिवशी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून चौघांनी एका तरुणाच्या घरात घुसून रिकाम्या सिलेंडरच्या टाकीने व खोऱ्याच्या दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना (ता. 30 जानेवारी) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सासवड (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील खंडोबानगर परिसरात घडली. याप्रकरणी रविवारी (ता. 22 फेब्रुवारी) सासवड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर बबलु नातु, निलेश बबलु नातु (रा. दोघेही खंडोबानगर, सासवड ता. पुरंदर), प्रशांत गणेश पासलकर (रा. जय महाराष्ट्र चौक, सासवड ता. पुरंदर), व पप्पू जाधव (पुर्ण नाव माहीत नाही) रा. जगतापआळी, सासवड ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सनी भरत पवार (वय 35, रा. खंडोबानगर, व्यवसाय मजुरी, रा. सासवड ता. पुरंदर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सनी पवार यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी पवार हे सासवड गावच्या हद्दीतील खंडोबानगर परिसरात राहत असून मजुरीचा व्यवसाय करतात. 29 जानेवारीला सनी पवार व वरील चौघेजण यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. रविवारी 30 जानेवारीला फिर्यादी सनी पवार राहत असलेल्या ठिकाणी सागर नातु, निलेश नातु, प्रशांत पासलकर व पप्पू जाधव यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला.
यावेळी 29 जानेवारीला झालेल्या भांडणाचा मनात राग धरून वरील चारही आरोपींनी घरात असलेल्या रिकाम्या सिलेंडरच्या टाकीने व खो-याच्या दांडक्याने मारहाण केली. या घटनेत पवार यांच्याडोक्याला, डाव्या हाताला आणि डाव्या पायाला दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पवार यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध बी.एन.एस. कलम 333, 118(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक खंडागळे पुढील तपास करत आहेत.





