Pune Crime : यवत, ता. 23 : लग्नसमारंभाच्या गडबडीत अज्ञात चोरट्याने 8 वर्षांच्या मुलाच्या गळ्यातील तब्बल 1 लाख 64 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 20) यवत गावाच्या हद्दीतील गणेश मंगल कार्यालयात घडली.

याप्रकरणी संभाजी शिवाजी मगर (वय 40, व्यवसाय नोकरी, रा. देवकरवाडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संभाजी मगर व संबंधित कुटुंब समारंभासाठी यवत येथील गणेश मंगल कार्यालयात समारंभासाठी आले होते. कार्यक्रम सुरू असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचा मुलगा शिवतेज मगर याला काहीही समजू न देता त्याच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावून नेली. काही वेळाने मुलाच्या गळ्यातील चैन गायब असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली.
दरम्यान, घटनेनंतर परिसरात शोधाशोध करण्यात आली; मात्र चोरटा पसार झाला. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल कार्यालयातील समारंभात चोरीचे प्रकार वाढतच चालले आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, “लग्नसमारंभालाही सुरक्षितता उरली नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. तपास पोलीस हवालदार सोनवणे करींत आहेत.






