पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना उलटत आला असताना, या प्रकरणातील गूढ उकलण्याऐवजी अधिक गडद होत चालले आहे. मात्र, हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात होता की एखादा मोठा ‘घातपात’, या प्रश्नाने आता संपूर्ण महाराष्ट्राला अस्वस्थ केले आहे. 28 जानेवारीला बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा अंत झाला होता. याची चौकशी अजूनही सुरु आहे.

नेहमीच्या पायलटऐवजी शेवटच्या क्षणी बदललेला वैमानिक आणि विमानाचा मार्ग यावरून सुरुवातीपासूनच शंका उपस्थित केल्या जात होत्या. आमदार रोहित पवार यांनी पुराव्यांसह काही तांत्रिक त्रुटी समोर आणल्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
‘राजीव गांधीं’प्रमाणे हत्या? मिटकरींचे गंभीर सवाल
अकोल्यातील पारस फाटा येथे बोलताना मिटकरींनी थेट वैमानिक सुमित कपूरवर निशाणा साधला. “ज्याप्रमाणे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसाठी सुसाईड बॉम्बरचा वापर झाला, तसाच प्रकार इथेही घडला का?” असा खळबळजनक प्रश्न त्यांनी विचारला. त्यांच्या दाव्यामागे काही महत्त्वाचे तर्क आहेत:
पायलट सुमित कपूरची पार्श्वभूमी संशयास्पद असल्याचा दावा केला जात आहे. अजितदादांचे नियमित वैमानिक कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे ऐनवेळी ‘ट्रॅफिक’मध्ये कसे अडकले? त्यांचे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज का लपवले जात आहेत?
या प्रकरणातील ‘ब्लॅक बॉक्स’चा डेटा आणि विमानतळाचे सीसीटीव्ही अद्याप सार्वजनिक का झाले नाहीत, हा महत्वाचा मुद्दा आहे. तपासातील ही दिरंगाई केवळ प्रशासकीय चूक आहे की जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.






