Accident : अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात भीषण अपघात (Accident) घडल्याची घटना समोर आली आहे. राणीगाव घाटात बोलेरो पिकअप वाहन दरीत कोसळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे, तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राणीगाव घाट येथे घडली.बोलेरो पिकअप वाहन शिवाझरी येथून राणीगावकडे जात होते. वाहनात कंजोली आणि राणीगाव येथील सुमारे 15 ते 20 नागरिक प्रवास करत होते. हे सर्वजण मध्यप्रदेशातील देडतलाई येथे बाजारासाठी गेले होते आणि परत येत असताना हा अपघात झाला.
रस्त्यात घाट परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे 60 ते 70 फूट खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
जखमींना तात्काळ उपचारासाठी धारणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातातील सर्व मृतक कंजोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.






