Theur News : लोणी काळभोर, ता. 23 : थेऊर ते कोलवडी रस्त्यावर एकाच कुटुंबातील चार जणांना दुचाकी अडवून शिवीगाळ करत लाकडी बैटन पट्टी व दगडाने बेदम मारहाण केल्याच्या ‘बकासुर’ प्रकरणातील फरार आरोपीला अखेर लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

प्रसाद धनाजी सोनवणे (रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी अक्षय धनाजी सोनवणे, सविता धनाजी सोनवणे (रा. थेऊर) आणि बकासुर (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांना पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी तनिष्का गणेश नायक (वय 19, रा. गावठेवस्ती, साई विश्व सोसायटी, मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिष्का नायक या आपल्या पती गणेश नायक, सासू अंबिका नायक, सासरे दिलीप नायक आणि नणंद लक्ष्मी यांच्यासह मोटारसायकलवरून घरी जात होत्या. 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान थेऊर-कोलवडी रस्त्यावर श्री चिंतामणी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा प्रकार घडला.
यावेळी अक्षय सोनवणे, प्रसाद सोनवणे आणि बकासुर यांनी त्यांची दुचाकी अडवून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर अक्षय व प्रसाद सोनवणे यांनी लाकडी बैटन पट्टीने तनिष्का नायक, अंबिका नायक आणि लक्ष्मी यांना मारहाण केली. तर बकासुर याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलून तनिष्का नायक यांच्या कपाळावर मारल्याने त्या जखमी झाल्या. तसेच इतरांनाही हाताने मारहाण करून धमकावण्यात आले.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 115 (1), 118 (1), 125, 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांना अटक केली होती. मात्र प्रसाद सोनवणे हा तेव्हापासून फरार होता. अखेर पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला थेऊर परिसरातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार दिगंबर जगताप, पोलीस अंमलदार अमोल जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.







