नवी दिल्ली: हरियाणाची सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसला काश्मीरच्या सत्तेसाठी समझोता करावा लागू शकतो. नॅशनल कॉन्फरन्सला सात अपक्षांची सोबत मिळाली आहे. यामुळे नॅशनल कॉन्फरन्स स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते. यामुळे काँग्रेसची बार्गेनिंग पाँवर कमी होण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने विधानसभेची निवडणूक सोबत लढली होती. नॅशनल कॉन्फरन्सचे ४२ आणि काँग्रेसचे सहा आमदार निवडून आले आहेत. तर सात अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. जम्मू-काश्मीरातील सात अपक्षांनी नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. यात त्या तीन आमदारांचाही समावेश आहे, ज्यांनी नॅशनल कॉन्फरन्सशी बंडखोरी करून निवडणूक लढवली होती.
काँग्रेसचे बंडखोर आमदारही नॅशनल कॉन्फरन्सला साथ देणार आहे. अपक्ष आमदारांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे काश्मिरात काँग्रेसच्या मदतीशिवाय नॅशनल कॉन्फरन्स सरकार स्थापन करू शकते, यामुळे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला स्थान मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस सरकारमध्ये असणार की नाही, हाही प्रश्न आहे.
मुझफ्फर इक्बाल खान यांनी २०१९ न्यायमुर्तीपदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनी राजौरी जिल्ह्यातील थन्नामंडी मतदारसंघात भाजपचे मोहम्मद इक्बाल मलिक यांचा ६१७९ मतांनी पराभव केला आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. नॅशनल कॉन्फरन्सने मुझफ्फर खान यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आघाडी करताना ही जागा काँग्रेसला मिळाली. यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि जिंकले. त्यांचे वडील अस्लम खान २००२ मध्ये राजौरीतून आमदार म्हणून निवडून आले होते. किश्तवाडच्या इंदरवालचे अपक्ष आमदार प्यारे लाल शर्मा हेही नॅशनल कॉन्फरन्समध्ये सामील होऊ शकतात. पूंछमधील सुरनकोटचे अपक्ष आमदार चौधरी अक्रम खान यांनी २०१४ मध्ये निवडणूक जिंकली होती. सर्व अपक्ष आमदार नॅशनल कॉन्फरन्समध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.
जम्मूतील छांबमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तरनचड यांचा पराभव करणारे अपक्ष सतीश शर्मा (काँग्रेस बंडखोर) हेही एनसीमध्ये सामील होण्याच्या मनस्थितीत असल्याचे वृत्त आहे. एनसीचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही त्यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, कॉंग्रेस नेतृत्वही त्यांची मनधरणी करत असल्याचे बोलले जात आहे. कठुआ जिल्ह्यातील बानीचे अपक्ष आमदार डॉ. रामेश्वर सिंह हेही नॅशनल कॉन्फरन्समध्ये सामील होत आहेत.