नवी दिल्ली : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज शुक्रवारी १९ एप्रिल रोजी शांततेत पार पडलं. आज सकाळी सात वाजल्यापासून सूरु झालेल्या मतदानाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंपर मतदान केले. देशातील २१ राज्यातील १०२ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली.
पश्चिम बंगाल ते त्रिपुरा, मेघालय, तर उत्तर प्रदेश-बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि उत्तराखंडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण पाच मतदारसंघात ५४.८५ टक्के मतदान झाले.
पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश आहे. पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. २०२४ मध्ये चित्र वेगळे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार हे मैदानात उतरले आहेत. या पाचही ठिकाणी थेट लढत आपल्याला पाहायला मिळाली.
महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
रामटेक: ५२.३८ टक्के
नागपूर: ४७.९१ टक्के
भंडारा- गोंदिया: ५६.८७ टक्के
गडचिरोली- चिमूर: ६४.९५ टक्के
चंद्रपूर: ५५.११ टक्के
या उमेदवारांचे भवितव्य पेटित बंद
नागपूर : महायुतीचे नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे
रामटेक : महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे
चंद्रपूर-वणी-आर्णी : महायुतीचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रतिमा धानोरकर
भंडारा-गोंदिया : महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ.प्रशांत पडोळे
गडचिरोली-चिमूर : महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडचे नामदेव किरसान