Sudan Abyei Clash : सुदान आणि दक्षिण सुदान या दोन्ही देशांनी दावा केलेला तेल समृद्ध प्रदेश अबेई येथील गावकऱ्यांवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे, या अंदाधुंद गोळीबारात संयुक्त राष्ट्र शांतता सैनिकासह ५२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या अबेई प्रदेश दक्षिण सुदानच्या ताब्यात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदुकधारींनी शनिवारी संध्याकाळी हल्ला केला. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.
एपी या वृत्तसंस्थेने एका प्रादेशिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने या घटनेची माहिती दिली आहे. अबेईचे माहिती मंत्री बुलिस कोच यांनी या घटनेबाबत सांगितले की, अबेई येथील गावकरी आणि बंदूकधाऱ्यांमध्ये रविवारी चकमक झाली. यावेळी बंदुकधाऱ्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. यात महिला, लहान मुलांसह अनेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. नेमकी ही घटना कोणत्या कारणामुळे घडली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही. मात्र, जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
कोच पुढे म्हणाले की, या हिंसाचारात सहभागी हल्लेखोर नुएर जमातीचे होते. ते मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज होते. या सशस्त्र तरुणांनी गेल्या वर्षी पुरामुळे त्यांच्या भागातून वराप राज्यात स्थलांतर केले होते. तेथून परतल्यानंतर जमिनीच्या वादातून गावकरी आणि त्यांच्या वाद सुरू झाला होता. सुदानमध्ये दररोज वांशिक हिंसाचार होत असतो. शेजारच्या वॅरॅप राज्यातील ट्विक डिंका हे आदिवासी सीमेवरील अनित भागावर अबेईच्या एनगोक डिंका यांच्याशी जमिनीच्या वादात अडकले आहेत. याच वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.